काल आणि आज

   20 व्या शतकातील शेवटचे दशक व 21 व्या शतकातील पहिली 10 वर्षे हा काल भारतीय इंटरनेट च्या वापराच्या दृष्टीनें सुवर्णकालच म्हणायला पाहिजे. इंग्रजी व युरोपियन भाषांचे प्राबल्य असणारे इंटरनेट युनिकोड स्टॅण्डर्ड मार्फत जगातील सर्व भाषांना आत्मसात् करूं शकले. प्रसाराबरोबर इंटरनेटच्या वापरासाठी येणारा खर्चही झपाट्यानें खाली आला आहे व येतही आहे. आज वेब-साइट करणे व वेब-पब्लिशिंग करणे हें सामान्य माणसाच्या आवाक्यांत आलेले आहे. त्याचबरोबर देवनागरी लिपीचा (खरे म्हणजे सर्व भारतीय भाषांचा) कॉम्प्यूटरवर वापर् या शतकाच्या सुरवातीपासून मुक्तपणे होवूं लागला. सर्व OS (Operating System) मध्ये देवनागरी सह युनिकोडचा अंतर्भाव केला गेल्यामुळे देवनागरी लिपी, फॉण्ट, की-बोर्ड इ. साठी काहीही जादा पैसे न मोजावे लागतां त्या सुविधा जगातील सर्व कॉम्प्यूटर वर उपलब्ध झाल्या; आणि असा मजकूर युनिकोड स्टॅण्डर्ड मध्ये असल्याने, ती कोणत्याही फॉण्ट-कंपनीची मक्तेदारी राहिली नाही.

माहिती-तन्त्रज्ञानाच्या क्षेत्रांत (भारतीयांच्या दॄष्टीनें झालेली ही पहिली मुख्य क्रान्ती)

   या क्रान्तीचा अगदी प्राथमिक फायदा म्हणजे छापलेल्या पुस्तकांच्या पानांच्या jpg/pdf फाइल्स वेब-साइटवरून वाचतां येण्यासाठी ठेवतां येऊं लागल्या. त्यासाठीं 'वेब-पब्लिशिंग' सुद्धा करावे लागत नव्हते! तो मार्ग काही कुलांनीं अंमलातही आणला.

  काही कुलांनी यापुढील एक पायरी देखील गाठली. वेब-कुलवृत्तान्ताचा संकल्प सोडून वेब-पब्लिशिंग करून त्यांनी त्यांच्या साइटचे मुखापृष्ठ केले (कुलदैवतांचे, मूळ गावांचे फोटो इ. चा त्यांत अंतर्भावही केला); कुलबान्धवांना माहिती पाठविण्यासाठीं पत्ता देऊन, फॉर्म पाठविण्याचे आवाहनही केले. त्यासाठीं काहींनीं साइटवर फॉर्म ठेवून तो डाउनलोड करण्याचीही सोय ठेवली. त्यापुढे काय करायचे हें अजून त्यांच्या कुलमंडळांत ठरलेले नसावे.

  संगणकाच्या Operating System मध्ये जालेल्या (वर उल्लेखिलेल्या) पहिल्या क्रान्ती पेक्षांही महत्त्वाची अशी दुसरी क्रान्ती म्हणजे MySQL सारख्या Client-Server Open-Source वेब-डेटाबेस ची उपलब्धी आणि त्यासाठीं लागणार्‍या PHP, PhpMyAdmin, BARAHA यासारख्या Open Source utilities ची देखील उपलब्धता. या सर्व प्रणाली मध्ये युनिकोडचा पूर्ण अंतर्भाव केलेला असल्यानें कोणतेही database-application भारतीय भाषांमधून पाहिजे त्या पद्धतीनें तयार करणे आणि दर्शकांपुढे मांडणे शक्य झाले. ही दुसरी क्रान्ती नसती तर 'कुलवृत्तान्तासारखा' डेटाबेस करून तो नाममात्र खर्चांत मंडळांना देतां आला नसता.

  वेब-वर करता येणारा active डेटाबेस हा कुलवृत्तान्ताचा प्राणच आहे. अशा डेटाबेसमध्ये कुल-मंडळाच्या मॅनेजर-कडून वारंवार माहिती अपडेट करतां येत असल्यामुळे असा डेटाबेस कायम ताजा राहूं शकतो. नेमका हाच धागा पक्डून कुलवृत्तान्तांचा ताजा active database (updated) ठेवून त्यातील पाहिजे ती माहिती PHP QUERY मार्फत दर्शकाला क्षणार्धात दाखविण्याची सोय केलेली आहे.

  कुलवृत्तान्त पहात असतांना कोणाही दर्शकाला त्याच्या पिढीतून 'पत्‍नी' किंवा 'अपत्य' यांची On-Line Data-Entry करणे शक्य व अतिशय सोपे आहे. त्याचप्रमाणे त्याच्या स्वत:च्या माहितीत काही बदल करावयाचा असल्यास तेंही शक्य होते. अशी नोंदणी विनामूल्य होते; मात्र ती नोंद्णी नंतर (आठवड्यातून एकदा वगैरे) कुलमंडळाच्या एखाद्या मॅनेजरने (त्याच्याकडे पासवर्ड असतो) पाहून मान्य केल्याचें बटण दाबले, कीं लगेच ती माहिती मुख्य डेटाबेसमध्ये समाविष्ट होते. इतर काही पाश्चात्य genealogical प्रणालींमध्ये कोणताही दर्शक (मॅनेजरची संमती न घेतां) वरील पद्धतीने (On-Line) भरलेली माहिती परस्पर मुख्य डेटाबेसमध्ये परस्पर नोंदवूं शकतो. आपल्या समाजांत काहीं समाजकंटक (गैरसमज पसरविणे किंवा त्यातून अनिष्ट लाभ मिळविणे आदि) काही अनिष्ट हेतूंनी असें करून त्या कुलमंडळांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवूं शकतात, म्हणून त्यासाठीं त्यावर मंडळाचा हा वचक ठेवावा लागला आहे.