परिचय

भारतातील कोकणस्थ ब्राह्मणांच्या (चित्तपावनांच्या) सु. ३२० कुलांपैकी (वत्स आणि भारद्वाज गोत्रांतील) ‘ सोवनी-सोहनी-सोहोनी-सोनी ’ हे कूळ आहे. दैदीप्यमान, हुशारी व जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रातील प्राविण्य, हे गुण, इतर चित्तपावनांप्रमाणे ‘सोहनी’ कुलातील व्यक्तींचे ठायी दिसून येतात. ‘सोहनी’ कुलाचा गेल्या सुमारे २५०-३०० वर्षांचा इतिहास त्या त्या घराण्याच्या व्यक्तींकडे टिपणे-स्वरूपात होता तसेच त्याचे ‘छापील कुलवृत्तांत’ असे प्रकाशन १९४९ मध्ये झालेले होते.

आता तो वेब-साईटवर उपलब्ध होत आहे.

वत्सगोत्री सोवनी कुलाची निरनिराळी ३६ घराणी असून भारद्वाजगोत्री यांची ५ आहेत. ज्या घराण्यातील काही व्यक्तींचे वास्तव्य अद्यापि त्यांच्या कोकणातील मूळच्या गावी आहे, त्या घराण्यांना खुणेकरिता मूळच्या गावाचे नाव दिले आहे. आज सोमेश्वरी कुलकर्णी, खोत, शेवडे, भैरव, मळकर या उपपदांनी ओळखली जाणारी घराणी आहेत. त्यांच्या नावापुढे वरील उपपदे जोडली आहेत. हिंदळे व सोमेश्वर येथून काही सोवनी मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातच निरनिराळ्या ठिकाणी राहावयास गेली. अशा घराण्यांना ती ज्या गावी प्रथम स्थायिक झाली त्या गावाचे नाव खुणेकरिता दिले आहे आणि जी घराणी सोमेश्वर गाव सोडून देशावर स्थायिक झाली त्या घराण्यांना देशावरील गावाचे नाव दिले आहे.