संकल्पना

जगांत कोणत्याही समाजात, एका कुटुंबातील सर्व व्यक्ती (दक्षिण भारतात असलेल्या पद्धतींसारख्या काही प्रथा वगळून) एका ठराविक नावानें ओळखल्या जातात; ज्याला 'कुल-नाम' किंवा 'आडनाव' असें म्हणतात. काही थोड्या कुटुंबांच्या बाबतीत एका कुलांत एकापेक्षां जास्त आडनावांचा समावेश झालेला आहे (उदा. गोखले- रास्ते). आज कोणत्याही कुटुंबातील व्यक्ती जवळजवळ जगभर विखुरलेल्या आहेत; परंतु इतिहासकालांत त्यांचे पूर्वज भारतातील एका लहानशा क्षेत्रांत (उदा. कोंकणातील एखाद्या जिल्ह्यांत) रहात होते. त्या काळापासून, ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे, त्या त्या घराण्याचा आजपर्यंतचा इतिहास व वंशावळी तयार करून, त्यांत निरनिराळ्या ठिकाणी रहाणार्‍या कुलबंधूंची माहिती नोंदवून; त्या त्या 'कुलाचें वृत्त' तयार करण्याचे बहुमोल कार्य पूर्वीच्या पिढीतील अनेक समाजधुरीणांनीं केलेले आहे. त्याला घराण्यांची, कुलदैवतांच्या फोटोसह कुलाबद्दलच्या सर्व माहितीची जोड देऊन त्या कुलाचे 'कुलवृत्तान्त' तयार झालेले आहेत. काही कुलांच्या दोन-तीन आवृत्त्या देखील उपलब्ध आहेत.

प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान असतो, आपल्या पूर्वजांबद्दल आदर असतो, कुळाचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते, आपल्या घराण्यातील सर्व नातेवाइकांबद्दलची माहिती घेण्याची इच्छा असते, धार्मिक वृत्तीच्या व्यक्तींना कुलदैवतांबद्दल श्रद्धा असते, आपल्या कुलातील / घराण्यातील रीतीरिवाज, सणवार, कुलाचार याची माहिती असावीशी वाटते. पूर्वी एकत्र कुटुंब-पद्धतीत सहजरीत्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असलेले हें ज्ञान नवीन पिढीला मिळण्यासाठीं आज 'कुलवृत्तान्ता' वर अवलंबून रहाता येते. आपल्या धर्माप्रमाणे (कर्मकांड नाही) अंत्येष्टीच्या वेळेला सुद्धा मृत व्यक्तीबरोबरच त्याचे वडील, त्याचे आजोबा, त्याचे पणजोबा अशा एकंदर चार पिढ्यांतील व्यक्तींच्या नामोच्चाराशिवाय विधी पूर्ण होत नाही. आज विभक्त कुटुंबपद्धतीत ही माहिती ताबडतोब मिळण्याचे एकमेव साधन म्हणजे अद्ययावत‍ ठेवलेला कुलवृत्तान्त.

'कुलवृत्तान्त कशाला पाहिजे?' असा प्रश्न विचारणार्‍यांनी प्रथम याचे उत्तर द्यावे कीं 'इतिहासाची गरज आहे कां?' आज जगभरांत इतिहासाची लाखो पुस्तके लिहिली गेली आहेत आणि अजून त्यावर PhD करणारे संशोधक आहेतच. प्रत्येक देशाचा, प्रत्येक वंशाचा, प्रत्येक संस्कृतीचा, प्रत्येक कालखंडाचा इतिहास लिहिला गेलेला आहे; कारण त्याची गरज होती-आहे. एवढेच काय तर संपूर्ण विश्वाचा कित्येक कोटी वर्षांचा इतिहास जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ 'स्टीफन हॉकिन्स' यांनी 'A Brief History of Time' या नावानें लिहिलेला आहे. थोडक्यांत म्हणजे 'इतिहास' ही संकल्पना जगांत सर्वत्र, सर्व कालांत आणि भविष्यांत सुद्धा आवश्यक आहे, त्यांत 'त्याज्य' असें काहीही नाही. कुलवृत्तान्त हा 'कुलाचा इतिहास'च आहे, म्हणून ज्याकरितां लोकांना इतिहासाची गरज भासते, त्याच कारणाकरितां कुलवृत्तान्ताची देखील गरज आहे. पूर्वजांकडून आपल्याला मिळालेला हा अमूल्य ठेवा आहे; आणि त्याचे जतन करून त्यांत हल्लीच्या पिढ्यांची माहितीची भर टाकणे हें आपले आद्य कर्तव्य आहे. आपण केल्याशिवाय पुढच्या पिढ्यांना हें कसे मिळणार?

कोणत्याही कुलवृत्तान्ताचे मुख्यत्वेकरून दोन भाग होतात, कायम रहाणारा(static) आणि बदलणारा(dynamic).

कायम रहाणारा:- यांत कुलाचा इतिहास, कुलदैवते, कुलस्वामिनी, कुलातील आडनावे, घराणी, कुलाचार, चालीरीती, मूळ गाव (गावे), इ. ही माहिती येते. - या माहितीत वर्षानुवर्षे सहसा बदल होत नसतो.
बदलणारा:- यांत प्रत्येक घराण्याच्या 'मूळ पुरूषा' पासून आजच्या पिढीपर्यंत सर्व व्यक्ती(मृत व हयात), त्यांचे नातेसंबंध, वंशावळी, त्या व्यक्तींची असेल तेवढी माहिती आणि त्यातून निर्माण होणार्‍या स्त्री-पुरूषांच्या नात्याप्रमाणे याद्या(सूची) यांचा अंतर्भाव आहे. - ही माहिती काळनुरूप (सारखी) बदलत असते. नवीन व्यक्ती जन्माला येतात, वृद्धांचे निर्वाण होते, या कुळातील मुली लग्न होवून सासरी (दुसर्‍या कुळांत) जातात, मुलांचे विवाह होवून नवीन (दुसर्‍या कुळातील) मुली सुना होवून या कुळांत येतात, इ. इ.

यामुळे कोणत्याही कुलवृत्तान्ताच्या नवीन आवृत्त्या काढल्या तरी त्यांत 'कायम' स्वरूपाची माहिती आहे तशीच राहते; पण व्यक्ती व त्याच्या माहितीत 'बदल' होतात, आणि त्यानुसार वंशावळी देखील बदलतात. त्याचबरोबर हेंही ध्यानांत येईल कीं व्यक्तींच्या बाबतीत होणारे हे बदल सारखे (जवळजवळ दररोज) होत असतात आणि त्यामुळे वंशावळ देखील सारखी बदलत रहाते. याच कारणामुळे कोणत्याही कुलवृत्तान्ताची नवीन आवृत्ती अगदी दरवर्षी काढली तरी ती काढल्याच्या दुसर्‍या दिवशीसुद्धा तिला 'ताजी' म्हणणे चुकीचे होते.

कुलवृत्तान्त 'मराठीत' असावा कीं 'इंग्रजीत' हा प्रश्न बर्‍याच जणाच्या मनांत येत असतो. पुढच्या पिढ्यांना इंग्रजीत असलेला वाचायला सोपा, असा एक युक्तिवादही केल जातो. पण या बाबतीत आपण हें लक्षांत घ्यायला पाहिजे कीं कुळातल्या सर्वसाधारण व्यक्तींना कोणत्या भाषेंतील कुलवृत्तान्त वाचण्यास सोपा जातो. कुळातील काही जण जरी परदेशीं वास्तव्य करीत असले तरी भारतातच रहाणारे लोक बहुसंख्य आहेत, यांत शंका नाही. 'कुलवृत्तान्त' हा कुलातील सगळ्यांसाठी असल्यानें तो मातृभाषेतूनच (मराठीतून) असायला पाहिजे. त्याचबरोबर इंग्रजी भाषेपेक्षां पाश्चात्य संस्कृतीत आपल्यकडे प्रचलित असलेले कित्येक नातेसंबंध अस्तित्वांतच नाहीत. खालील यादी पाहिल्यावर लगेच ध्यानांत येईल कीं 'इंग्रजीतील कुलवृत्तान्त' आपली कुटुंबसंस्था योग्य स्वरूपांत दाखवूं शकत नाहीं.

'सून, जावई, नात, नातसून, नातजावई, सासू, सासरे, वहिनी, मेहुणा, काका, मामा, काकू, मामी, मावशी, आत्या, आतोबा, पणजोबा, पणजी, दत्तक गेलेला, दत्तक आलेला, मानसपुत्र, सासुरवाशीण, माहेरवाशीण, सासर, माहेर, पूर्वाश्रमीची, घराणे, इ.' या नात्यांना इंग्रजीत सुटसुटीत नावेच नसल्याने, (पाश्चात्य संस्कृतीत काका-मामा, काकू-मामी-मावशी, अशा कित्येक नातेसंबंधातला फरकच त्यांच्या ध्यानांत येत नाही) सध्या तरी इंग्रजीचा पर्याय बाजूला ठेवावा लागणार आहे.