कुलवृत्तान्ताचे भविष्य काय?

अ] 'कुलवृत्तान्त' ही काही विशिष्ट जातीची/धर्माची मक्तेदारी नाही. इच्छा असलेल्या कोणत्याही समूहाला त्यांचा 'कुलवृत्तान्त' करतां येतो. आज 'मच्छीमार संघटना' देखील त्यांचा वेब-कुलवृत्तान्त तयार करीत आहे. विसाव्या शतकांत सुमारे 100 कुलांचे (आडनावांचे) कुलवृत्तान्त तयार झालेले आहेत. 'कुलवृत्तान्त म्हणजे 'त्या कुलाचा आजपर्यंतचा इतिहास'.

'इतिहास' म्हणजे 'इति-ह-आस' म्हणजे 'असें-असें घडले'. त्यांत इतिहासकाराला त्याची 'मते' मांडण्याचे प्रयोजनच नाही. 'जे पूर्वी घडून गेले, तें नि:पक्षपणे मांडणे हें त्याचें कर्तव्य. तो वाचून काय बोध घ्यायचा, ते वाचक घेतीलच. 'आपण कोण?' 'आपण कोठून आलो?' 'आपले पूर्वज काय करीत होते?' या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. प्रत्येक राष्ट्राचा 'इतिहास' जसा त्या राष्ट्राच्या नागरिकांसाठीं 'ठेवा' म्हणून जपला पाहिजे, तसाच प्रत्येक कुटुंबाचा 'इतिहास' हा त्या-त्या कुटुंबासाठीं मोलाचा आहे. एकदां जर त्यातील सातत्य गेले, तर त्यानंतरच्या पिढ्यांना तो मिळणारच नाही. आशिया-युरोप मधील जवळजवळ सर्व देशांतील लोकांनी त्यांच्या-त्यांच्या कुटुंबांचा 'इतिहास' (त्यांना फारच थोडा माहित आहे, ही वस्तुस्थिती असली तरीही) शक्य-तितका जतन केलेला आहे. अमेरिकेसारख्या काही देशांना फारच कमी 'इतिहास' उपलब्ध असल्यानें त्यांनाच त्याबद्दल खंत वाटते. ज्ञात असा सर्व 'इतिहास' जतन करण्यासाठीं त्यांचे आटोकाट प्रयत्न असतात. 'मॉरिशस' मध्ये 200-300 वर्षांपूर्वी स्थलांतरित होवून गेलेल्या भारतीयांच्या आजच्या पिढीतील 30-40 जण केवळ त्यांच्या पूर्वजांची माहिती मिळविण्यासाठीं (to know their family-roots) महिनाभर भारतांत येऊन शोध घेत होते. 'जगाचा इतिहास', 'मानवाचा इतिहास' पृथ्वीवरील 'जीवसृष्टीचा इतिहास' लिहिण्यांत कित्येक संशोधक व्यग्र होते- अजूनही आहेत. 'विश्वाच्या उत्पत्तीचा 'इतिहास' यासाठीं 'A Brief History of Time' हें 'स्टीफन हॉकिन्स' याचे पुस्तक तर प्रसिद्धच आहे. सारांश म्हणजे 'इतिहास' ही काळाची 'गरज' आहे. त्यांत त्याज्य असें काही नाही.

ज्या शंभर एक कुलांच्या उत्साही मार्गदर्शकांनीं त्यांच्या कुलवृत्तान्ताची पहिली आवृत्ती तयार करण्यासाठीं अपार परिश्रम घेतले, ते कोणत्या तरी ध्येय्यानें प्रेरित झालेले होते. त्यांच्या कष्टांचे फलित म्हणून तो कुलवृत्तान्त रूपी इतिहास त्यांच्या पुढच्या पिढीला मिळाला. पुढील कुलमंडळांनी तो वारसा पुढे चालवून, त्या माहितींत कालानुरूप नवीन व्यक्तींची भर घालून, नव-नवीन आवृत्त्या काढल्या; त्याचेच फळ म्हणून आज त्या त्या कुलांना निदान 20-40 वर्षांपूर्वी-पर्यंतचा 'कुल-इतिहास' उपलब्ध झाला आहे.

गेल्या पिढीपर्यंत जरी हें थोड्याफार प्रमाणांत होवूं शकले तरी त्यानंतर झालेला महत्त्वाचा फरक हा कीं, नवीन पिढीत कुटुंबातील व्यक्ती नोकरी-व्यवसाया निमित्त पूर्वीच्या ठिकाणापासून दूर-दूर पांगल्या, आणी एकमेकापासून अजूनही दूर जात आहेत. त्यामुळे पूर्वीच्या 'कुलमंडळां' सारखे दर आठवड्याला, दर-महिन्याला, एकत्र जमणे देखील अशक्य झालेले आहे. नवीन पिढीत जरी अनेक उत्साही लोक असले, तरी ते परस्परांपासून दूर (त्यापैकी कित्येक जण परदेशीं) वास्तव्यास असल्यानें वर्षांतून एकदां सुद्धा एकमेकांना भेटणे दुरापास्त झालेले आहे. काही कुलांच्या हल्ली होणार्‍या कुलसंमेलनाच्या आवाहनांतच "सदस्यांमध्ये पूर्वीचा उत्साह राहिलेला नाही!", "नवीन पिढीतील कार्यकर्ते त्यांच्या रोजच्या व्यापातून वेळ काढून कार्यकारिणीवर येण्यास तयारच होत नाहीत!" अशी वाक्ये दिसतात. अशा परिस्थितींत नवीन कुलमंडळाची मीटिंग तरी होणार केव्हां, माहितीचे संकलन करणार तरी कोण, तें पूर्ण तरी कसे होणार आणी पुढची आवृत्ती तरी निघणार कां, आणी केव्हां? या शंका सर्वांच्याच मनात रहातात.

ब] या परिस्थितीत सध्याच्या पिढीला मिळालेला हा 'कुलवृत्तान्त' रूपी ठेवा पुढच्या पिढी पर्यंत जाणार तरी कसा? 'तो जतन करून त्यांत वाढ करणे' हे पुढच्या पिढ्यांचे कर्तव्य आहे असें म्हणणे जरी सोपे असले, तरी 'तो त्या पिढीपर्यंत पोहोचणार कसा', हा प्रश्न अनुत्तरित राहतो. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुलवृत्तान्ताचे 'सातत्य' टिकूं शकेल अशी सुविधा मात्र आधुनिक तन्त्रज्ञानानें उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे हा 'कुलवृत्तान्त-रूपी' अमूल्य ठेवा इतिहासांत लोप न पावतां 'अजरामर' होवूं शकेल. या तन्त्रज्ञानाची रूपरेषा अशी...

१) जगांत कोठूनही' आपल्या कुलवृत्तान्ताच्या' कार्यांत सहभागी होवू इच्छिणार्‍या उत्साही कुल-बांधवांना, त्यांच्या सोयीप्रमाणे, कोणत्याही वेळीं, त्या कार्यांत सहभागी होण्याची सोय असली पाहिजे. त्यावेळीं इतर कोणी या कार्यांत सहभागी असलेच पाहिजेत, असें नाही. २) स्थल-काल या मर्यादांच्या पलीकडे जाऊन अशा उत्साही बांधवांना एकमेकाशीं अत्यल्प खर्चांत संपर्क साधण्याची त्यांत सोय पाहिजे. ३) तयार होणारे अद्ययावत्‌ कुलवृत्तान्त जगांत सगळ्या कुलबांधवांना सहज आणी अत्यल्प खर्चांत लगेच पहातां आले पाहिजेत. ४) कुलवृत्तान्ताच्या या उपक्रमांत पुढच्या पिढ्यांना देखील त्यांत भर घालून अद्ययावत्‌ ठेवतां येण्याची त्यांत सोय असली पाहिजे. ५) असा कुलवृत्तान्त कुलातील केवळ मातृभाषाच समजणार्‍या लोकांनाही वाचतां आला पाहिजे; तसेच देवनागरी वाचतां न येणार्‍यांनाही.

क] या निकषांवर तपासल्यास आपल्या लगेच ध्यानांत येईल कीं, 'पुस्तकरूपी आवृत्ती छापणे' ही प्रकाशन-पद्धती वापरतां येणार नाही. तसेंच वेब-साइटवर pdf/jpg फाइल्सच्या स्वरूपांत अशा आवृत्तीची पाने उपलब्ध करूनही हें साध्य होवूं शकत नाही; कारण हे सर्व मार्ग static स्वरूपाचे आहेत. आपल्याला कुलवृत्तान्ताचा असा dynamic-database नेटवर झाला पाहिजे, कीं जगांत कोणालाही केव्हांही त्यांत अधिक माहिती भरण्याचा (आणी बदल करण्याचा) 'विनंती-रूपी-अर्ज' स्वत:च्या कॉम्प्यूटरवरून विनामूल्य पाठवितां येईल; आणी यावर देखरेख ठेवणारा त्यांच्या कुलातीलच एखादा मॅनेजर, त्याच्या कॉम्प्यूटरवरून तो अर्ज एक-दोन दिवसांत पास करूं शकेल. त्यानें पास केल्यावर तो बदल आपोआपच त्या dynamic-database मध्ये समावेष्ट झाला पाहिजे. 'याहू-ग्रुप्स' सारख्या माध्यमातूनही हें साध्य होवूं शकत नाही. तें माध्यम परस्परांशीं चॅट करायला, किंवा थोडाफार संवाद ठेवण्यास जेमतेम पुरे पडते एवढेच.

कुलवृत्तान्ताचा हा डेटाबेस साइटवरच असेल तर 'वंशवृक्ष', 'सूची', 'घराण्याप्रमाणे', 'नावांप्रमाणे', अशा निरनिराळ्या प्रकारे तो जगातून कोणालाही पहाता येईल. युनिकोड-utf-8 या स्टॅण्डर्ड मध्ये केल्यास, तो भारतीय भाषांतून आणी/किंवा इंग्रजीतून दिसूंही शकेल. Google IME या मोफत उपलब्ध असलेल्या लिप्यंतराच्या (transliteration) सुविधेमुळे तो इतर लिपींमध्ये देखील वाचतां येईल. त्याचप्रमाणे साइटचे नाममात्र भाडे वेळेवर भरत राहिले कीं, असा active-database वर्षानुवर्षे पुढच्या पिढ्यांना ताज्या स्वरूपांत उपलब्ध होईल. अशा प्रकारे कुलवृत्तान्ताचा डेटाबेस करण्याचे तन्त्रज्ञान वापरून एखाद्या 'कुलवृत्तान्ताचा' मुख्य ढाचा तयार झाला कीं त्यांत भर टाकण्याचे काम करायला त्या कुलाचे उत्साही स्वयंसेवक निरनिराळ्या ठिकाणाहून मिळतील. त्यांची एकमेकांशीं पूर्वी कधी प्रत्यक्ष भेट झालेली नसेल तरी चालेल; आणी भविष्यांतही झाली नाही तरी चालेल. त्यांना एकत्रित-पणे काम करायला हा तन्त्रज्ञानाचा असा platform मिळाला कीं झाले.